"जस्टीस" फॉर कन्हैय्या


जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात ‘जेएनयु’ गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. देशप्रेम आणि देशद्रोह या विषयावर कन्हैय्या च्या माध्यमातून प्रसारमाध्यमे,संसद, न्यायव्यवस्था तसेच आम आदमी यांच्यामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु देशप्रेम व देशद्रोह यांच्या मुळाशी जाऊन कन्हैया प्रकरणाचा शोध घेतल्यास अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे अपोआप मिळू लागतात.कन्हैया चूक कि बरोबर यावर वादविवाद करण्यापेक्षा  या विषयाकडे समन्यायी भूमिकेतून पाहणे गरजेचे ठरणार आहे.  
 
वास्तविक पाहता जेएनयु हा डाव्या विचारसरणीचा बालेकिल्ला आहे. AISF च्या माध्यमातून कम्युनिस्ट पक्ष आपल्या समाजवादी विचारसरणीचा प्रचार व प्रसार करत आहे. त्यामुळे या विद्यापीठावर आपले वर्चस्व असावे असे मुख्य प्रवाहातील  राजकीय पक्षांना वाटते त्यामुळेच काँग्रेस प्रणीत NCUI, बीजेपी शी निगडीत असणारी ABVP या संघटना आपले अस्तित्व दर्शवितात परंतु काँग्रेस वगळता अन्य पक्षांना येथे शिरकाव करता आलेला नाही. यंदा प्रमुख संघटना अनेक गटातटांत विभागल्या जाऊन एक उपाध्यक्ष पद ABVP च्या पदरात पडले आहे.परंतु कन्हैया च्या रूपाने  कम्युनिस्ट पक्ष येथे सत्तेच्या खुर्चीत आहे.

जेएनयु हे प्रचलित विद्यापीठांच्या अभ्यासापलीकडचे एक स्वतंत्र विचारसरणीचे केंद्र आहे. त्यामुळेच इथला विद्यार्थी कट्यावर झडणाऱ्या चर्चांमधून घडत असतो. जेएनयु मध्ये शिष्यवृत्ती च्या प्रकरणावरून गेल्या सहा-सात महिन्यांपासून मोठा वाद चिघळला आहे. एम.फील व पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेट परीक्षा उत्तीर्ण असल्यास दरमहा जवळपास २५००० रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळत असते. तसेच नेट परीक्षा उत्तीर्ण नसणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील दरमहा ५००० रुपये शिष्यवृत्ती आहे. याबाबतीत विशेषतः नेट परीक्षा उत्तीर्ण नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बरेच बदल सुचविले आहेत. व जेएनयु  च्या विद्यार्थ्यांच्या मते  शिष्यवृत्ती बंद करण्याचा घाट घातला जात आहे. या निर्णयाच्या विरोधात जेएनयु चे विद्यार्थी  संघटीत झाले आहेत. येथे प्रवेश घेणारे ६० टक्के विद्यार्थी हे सर्वसामान्य व बेताचीच आर्थिक परिस्थिती असणारे आहेत. त्यामुळे जरी नेट परीक्षा उत्तीर्ण नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अगदी नगण्य असली तरी त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशी भूमिका त्यांनी  घेतल्याने जेएनयु व केंद्र सरकारमधील वादाला थेट तोंड फुटले होते. अशातच FTII च्या विद्यार्थ्यांना जेएनयु मधून मोठे समर्थन मिळत होते व अशातच रोहित वेमुल्लाचे प्रकरण पुढे आले आणि या सर्व संघर्षाची धार अधिक तीव्र होत गेली. आणि या सर्व प्रकरणात कन्हैय्या अन्यायाची शिकार ठरला.

जेएनयु च्या विद्यार्थ्यांसाठी आजदेखील कन्हैय्या कुणी ‘हिरो’ नाही. तो बाकीच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांपैकीच एक आहे. तो AISF चा एक सक्रीय सदस्य व एका भाषणाच्या जोरावर जेएनयु च्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष पद मिळविणारा एक विद्यार्थी नेता अशीच त्याची ओळख आहे. जेएनयु मधील निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा थेट हस्तक्षेप, पैशाची मोठी धूळधाण होत असते परंतु वैचारिक परिपक्वता, संघटनकौशल्य, नेतृत्वगुण यांच्या जोरावर बिहार मधल्या बेगुसराई जिल्ह्याच्या एका गावामधून आलेला कन्हैय्या जेएनयु चा अध्यक्ष बनणे हीच घटना या विद्यापीठाचे वेगळेपण दर्शविते. कन्हैय्या अफ्रिकन स्टडीज या विषयात पी.एच.डी.  च्या तिसऱ्या वर्षात शिकतोय व ‘ब्रह्मपुत्रा’ या वसतिगृहात राहतो. या नेत्याने परिषदेची सूत्रे हातात घेतल्यापासून विद्यार्थी हिताचे अनेक प्रश्न सोडविल्यामुळे सर्वांना त्यांच्याविषयी वेगळीच  सहानुभूती व आपुलकी निर्माण झाली  आहे. यामुळेच सर्व विद्यार्थी आपल्या संघटना सोडून कन्हैय्या च्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत व याद्वारे प्रखर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन या निमित्ताने या जेएनयु मधून होत आहे.

कन्हैय्या प्रकरणाद्वारे देशद्रोह या निरर्थक राष्ट्रव्यापी चर्चेला तोंड फुटले आहे. एखाद्या देशाविषयी देशप्रेम सोडून कोणतीच सर्वोच्य गोष्ट असू शकत नाही. जेएनयु मध्ये आपले विचार व भावना प्रकट करण्याचे अनेक मार्ग आहेत. कुणी आपले विचार कागदावर लिहून, कुणी व्यंगचित्रांच्या माध्यमातून तर कुणी भाषणांमधून निर्भीडपणे व्यक्त करत असतात. यासाठी कुणाच्या परवानगीची वा संमतीची गरज नसते कारण तो जेएनयु च्या ‘कल्चर’ चा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच आपल्याला जेएनयु च्या मुख्य इमारतीच्या भिंतींवर  विद्यार्थांनी रेखाटलेली चित्रे त्यांच्या विचारांची उंची प्रकट करत असतात. आणि या सर्व गोष्टी करत असताना कुणालाच आपली ओळख लपविण्याची गरज नसते. कारण एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीप्रधान बलशाली भारताचे एक जबाबदार आणि   विचार व्यक्त करण्याचे अत्युच्य दर्जाचे स्वातंत्र्य असल्यामुळे वैचारिक मतभेदाच्या पलीकडे जाऊन धर्म,जात, पंथ यापलीकडे जाऊन सहिष्णुता आपल्याला विद्यापीठात  पाहायला मिळते.  

जेएनयु मध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देण्याची अत्यंत दुर्देवी घटना घडली. परंतु ज्या पद्धतीने ही घटना घडवली गेली आणि तिचे ओंगळवाणे प्रदर्शन देशवासीयांसमोर केले गेले यामध्ये देशभरातील नव्या विघातक राजकीय परिवर्तनाची बीजे रोवली जात आहेत व आगामी काळात अशा घटनांचा देशाच्या एकात्मतेला व अखंडत्वाला मोठा धोका आहे. या विद्यापीठात काश्मीर प्रांताची स्वतंत्र अस्मिता जपणाऱ्यांचा एक गट आहे. दरवर्षी अफजल गुरूच्या हत्येच्या निषेधार्थ ते एक कार्यक्रम आयोजित करत असतात. परंतु त्यात राष्ट्राद्वेशाचा वा राष्ट्रविरोधाचा लवलेशही नसतो असा जेएनयु मधील सर्वसामान्य विद्यार्थाचा अनुभव आहे. काही युवक त्या दिवशी तोंडावर ‘मास्क ’ घालून आले  आणि त्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर देशविरोधी घोषणाबाजी केली व त्यावरून वाद चिघळला त्यावेळी कन्हैय्या त्या ठिकाणी नव्हता. परंतु गोंधळाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांनी विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष या नात्याने  कन्हैय्या ला घटनास्थळी मध्यस्ती करण्यासाठी बोलावले आणि नंतर जाणीवपूर्वक या सर्व घटनेचे खापर कन्हैय्या च्या डोक्यावर फोडून कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली त्याला केवळ अटक केली नाही तर भारतीय दंड संहितेचे कलम १२४ (अ) अन्वये देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला. ही दुर्दैवाची बाब आहे.

या सर्व घटनांचे साक्षीदार असणाऱ्या जेएनयु करांच्या मते, कन्हैय्या ला या प्रकरणात मुख्य आरोपी व सूत्रधार बनवून विद्यापीठाला बदनाम करण्याचे मोठे राजकीय षड्यंत्र रचले जात आहे. जेएनयु मधल्या राजकीय वातावरणातून जरी उद्याचे नेते घडत असले तरी सनदी सेवा परीक्षा , संशोधन क्षेत्र आदी ठिकाणी यशस्वीरीत्या काम करून इथल्या विद्यार्थांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे येथे देशभरातील विद्यार्थांची प्रवेशासाठी झुंड पडलेली असते. तसेच दिल्लीत उच्च शिक्षण घ्यायचे तर ते जेएनयु मध्ये अशी मनीषा बाळगून देशभरातील ग्रामीण भागातून येणाऱ्या युवकांची संख्या मोठी असते. व आपली बुद्धिमत्ता व गुणवत्तेच्या जोरावर येथे प्रवेश घेऊन आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करत असतात. त्यामुळे कन्हैया या देशभरातील महत्वाकांक्षी युवकांपैकीच एक आहे. आता या  सर्व विद्यार्थांना विद्यापीठाच्या नकारात्मक प्रसिद्धीचा मोठा त्रास सहन करावा लागत असुन यामध्ये सर्वाधिक चिंताग्रस्त झाले आहेत या सर्वाची पालकमंडळी.जवळपास ८-९ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्याविषयी केवळ काळजीच नव्हे तर त्यांच्या सुरक्षिततेविषयी चिंता वाटत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी जेएनयु कर सरसावले असुन माजी विद्यार्थी देखील यासाठी सक्रीय झाले आहेत. सदर घटना घडल्यापासून प्रशासकीय इमारतीच्या शेजारच्या ‘अॅम्फी थेटर’ मध्ये दररोज सायंकाळी AISF च्या वतीने राष्ट्रवाद या विषयावर क्लास भरविले जात आहेत. आता प्रत्यक्ष ‘फिल्ड’ वर काम करण्याची वेळ समजून सर्व विद्यार्थी संघटना आपल्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मग्न आहेत. परंतु या सर्व गोष्टीमधून थेटपणे सरकारच्या विरोधात म्हणजे बी.जे.पी. व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात मोठे वैचारिक द्वंद्व छेडले जात आहे. त्यामुळे थेट अशा प्रकारच्या विद्यार्थी आंदोलनांच्या माध्यमातून देशातील राजकीय परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही ही लोकशाहीच्या दृष्टीने घातक बाब आहे. यामुळे विद्यापीठे नाविन्य, शिक्षण व संशोधनाची केंद्रे बनण्याऐवजी राजकारणाचा अड्डा बनत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या देशातील तरुण शक्ती देशाला शिक्षण, तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून  प्रगतीकडे नेण्याऐवजी जात, धर्म, पंथ यांच्या जोखडा मध्ये त्यांना अडकवून आपण त्यांची सळसळते तारुण्य विधायक कामासाठी वापरत नाही याची कुणालाच जाणीव होत नाही परंतु याचा  भविष्यात देशाला मोठा तोटा होणार आहे.

कन्हैय्या ला जामीन मंजूर झाल्यानंतर तो विद्यापीठात येऊन त्याने ज्या पद्धतीने आपले विचार मांडले त्यावरून देशाला त्याच्या विचाराची व प्रगल्भतेची काही अंशी जाणीव झाली. परंतु या सर्व प्रकरणामुळे तो कुणाच्या दृष्टीने ‘आयडॉल’ झाला आहे तर कुणाच्या दृष्टीने शत्रू. त्यामुळे त्याच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तो आता जरी विद्यापीठ क्षेत्रात असला तरी त्याची मित्रमंडळी त्याची सुरक्षा पाहतात. मध्यंतरी एका माथेफिरू  युवकाने त्याच्या कानशिलात लावली. परंतु जेएनयु च्या विद्यार्थ्यांनी कायदा व सुव्यवस्था हातात न घेता अत्यंत जबाबदारीने त्या युवकाला बाजूला केले.व मोठी दुर्घटना टळली. कन्हैय्या ची सोशल मिडिया च्या माध्यमातून काही विवादास्पद फोटो पोस्ट करून अत्यंत खालच्या थराला जाऊन   बदनामी केली जात आहे. AISF ची एक युवती कार्यकर्ती जी कन्हैय्या पेक्षा ३ वर्षांनी लहान असुन विद्यापीठात एम फील चा अभ्यास पूर्ण करत आहे तिच्याविषयी विवादास्पद फोटो सोशल मीडियात व्हायरल केला आहे व ती कन्हैय्या ची शिक्षक आहे अशी अफवा पसरवली जात आहे. परंतु या सर्व गोष्टीमुळे टीम कन्हैय्या ला आव्हान देऊन त्याचे तथाकथित विरोधक मोठे वैचारिक संकट ओढवून घेत आहेत. कन्हैय्या च्या रूपाने एक नवा राजकीय नेता डाव्या विचारसरणीला मिळतो कि काय याची काहीजण वाट पाहून आहेत. थोडक्यात कन्हैय्या ‘सेलिब्रिटी’बनवला जात आहे कि एक बंडखोर नव्या युवक पिढीचा प्रतिनिधी हे लवकरच समोर येणार आहे.

जेएनयु मधील घटना ही देशातील बदलत्या राजकीय विचारसरणीचे द्योतक मानले जाऊ शकते. मोदी सरकारची राज्यसभेच्या विरोधकांच्या बहुमतामुळे महत्वपूर्ण धोरणांवर निर्णय घेण्यास होणारी पीछेहाट, त्यामुळे विकासाच्या मुद्यावरून सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचलेले मोदी सरकार काहीसे अडचणीत आले आहे. अशातच काश्मीर मध्ये सत्ता स्थापनेस होत असलेली दिरंगाई व दिल्ली व बिहार मधील विधानसभांच्या जनमताच्या कौलावरून घसरत चाललेला मतांचा टक्का व आगामी काळात उत्तरेकडील राज्यात येऊ घातलेल्या निवडणुका या पार्श्वभूमीवर पुढच्या काळात पुन्हा सत्तेची दोरी हातात ठेवण्यासाठी सगळा ‘थिंक टॅक’ कामाला लागला आहे. त्यामुळे आगामी निवडणुका विकासाच्या मुद्यावर लढायच्या कि लोकांच्या भावनांना हात घालून करायच्या हा सर्वात गहन प्रश्न सत्ताधाऱ्यांपुढे आहे. लोकांच्या भावनांवर निवडणुका झाल्यास धर्म हाच मोठा घटक असणार आहे व सत्तेची खुर्ची त्या मुद्यावर मिळाल्यास देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात येणार आहे व लोकशाहीला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

सरतेशेवटी जेएनयु मधील प्रकरण हाताळण्यात विद्यापीठ प्रशासन व पोलीस अपयशी ठरले आहेत. याचे कारण म्हणजे त्रयस्थ व्यक्तींकडून हे प्रकरण हाताळले जात होते. आमची जबाबदार प्रसारमाध्यमे व सोशल मिडिया  या गोष्टींचे गांभीर्य लक्षात न घेता ‘नकारात्मक’ पत्रकारीतेद्वारे देशवासीयांच्या भावना भडकवितात ही अत्यंत खेदाची बाब आहे. या देशाचे  गृहमंत्री याबाबत  वादग्रस्त विधाने करतात व चक्क न्यायव्यवस्थेची वकिली करणारे कन्हैय्या ला चक्क डोळ्यावर  पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेसमोर मारहाण करण्याचा प्रयत्न करून आपली राष्ट्रभक्ती व सहिष्णुता केवळ देशवासियांसमोर नव्हे तर जगासमोर मांडतात यामुळेच निदान वास्तव जाणून घेऊन कन्हैय्या साठी या देशात न्यायाची अपेक्षा व्यक्त करून राष्ट्रभक्तीला सर्वोच्य स्थानी ठेवून भारतीय संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने सजगपणे उभे राहिले पाहिजे.

***

Comments

Popular posts from this blog

Twist in the tale

Limitations of Government