निसर्ग, शेती आणि  कृषी व्यवसायाचे नवनिर्माण

0१७ या नववर्षाच्या आपणा सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचे स्वागत करत असताना नवीन संकल्पना व नवचेतना घेऊन आपण सर्वजण वाटचाल करण्याचा मनोदय करत असतो. ग्रामीण भागाच्या समृद्धीत भर घालण्यासाठी निसर्ग, शेती व कृषिव्यवसायाच्या नव्या आयामांचे सकारात्मक विश्लेषण करून केवळ आशावादी चित्र उभे न करता त्याला कृतीची जोड देण्याचा आपण सर्वजण संकल्प सोडूया.

निसर्ग, पर्यावरण हे गेल्या काही वर्षात अत्यंत परवलीचे शब्द बनत चालले आहेत. विकासाची नवनवी शिखरे पादाक्रांत करताना निसर्गाकडे दुर्लक्ष झाले आणि त्याचा समतोल बिघडला. याचा परिपाक म्हणजे केवळ राज्यानेच नव्हे तर संपूर्ण देशाने दुष्काळाची मोठी झळ सोसली. जागोजागी निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य व त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम यामुळे पुन्हा एकदा 'पाणी अडवा, पाणी जिरवा'चा केवळ नारा दिला गेला नाही, तर शासन, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावकर्‍यांच्या उत्फूर्त लोकसहभागामधून एक मोठी चळवळ उभी राहिली. परंतु या चळवळीला एक दिशा देऊन शाश्‍वत निसर्ग- पर्यावरण संवर्धनाचे मोठे आव्हान आपणा सर्वांसमोर असणार आहे. जागतिक तापमानवाढ, हवामानाबदल व त्या अनुषंगाने जगभरामधील बदलणारे राजकीय मतप्रवाह यांना भेदण्यासाठी मोठा कृतिकार्यक्रम सर्वांच्या समन्वयातून उभी राहण्याची गरज आहे. यासाठी गावपातळीवरील शेती व शेतकर्‍याला केंद्रस्थानी ठेऊन त्याचे अनुभव प्रयोगशीलता व नावीन्यपूर्ण उपक्रम यांना केवळ प्रोत्साहन न देता यशस्वी प्रयोगांची त्या त्या भौगोलिक प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर अंमलबजावणी करण्यास सर्वांना पुढे यायचे आहे.

ग्रामीण व्यवस्थेचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे शेती. जीवनशैलीचा भाग असणारी शेती बाजारव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनल्याने तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीमधील धोका वाढत चालला आहे. शेतीच्या अर्थव्यवस्थेमधील घसरता टक्का व शेतीमधील रोजगाराच्या कमी होणार्‍या संधी हा जरी चिंताजनक व गंभीर विषय असला तरी शेतीशिवाय आपणाला पर्याय नाही हे वास्तव आहे. अर्थशास्त्राच्या नियमानुसार देश प्रगती करत असताना द्वितीयक व तृतीयक क्षेत्रांचे अर्थव्यवस्थेमधील महत्त्व वाढते आणि प्राथमिक कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार सेवांचा प्रभावी वापर व कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून शेतीला व्यवसायिक करावे लागणार आहे. यासाठी शेतीशी निगडित असणार्‍या सर्वांना कालसुसंगत व तंत्रज्ञानानुसार मानसिकतेत बदल करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. शेतकर्‍यांना देखील अनुदानाधिष्ठित शेतीची संकल्पना सोडून बाजाराधिष्ठित शेतीची वाट शोधावी लागणार आहे.

यासाठी कृषी व्यवसाय सक्षम करणे आवश्यक आहे. कृषीव्यवसायाकडे शेतीमधील द्वितीयक व सेवा क्षेत्र म्हणून पाहणे आता संयुक्तिक असणार आहे. उच्च शिक्षण घेऊन देखील आजमितीला रोजगाराच्या म्हणाव्या अशा संधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील तरुणांमध्ये नैराश्य व वैफल्य निर्माण होत आहे. यासाठी शेती उत्पादनांवर प्राथमिक प्रक्रिया, द्वितीयक प्रक्रिया तसेच कृषी पणन व्यवस्थेमधे असणार्‍या व्यावसायिक संधी ओळखून तरुणाईने आपल्या शेतीला न्याय देण्याचा संकल्प सोडला पाहिजे. यासाठी नव्या स्वरुपामधील सहकार चळवळ हातात घेऊन आपल्या उन्नतीसाठी आपणास सक्षमपणे उभे राहिले पाहिजे.

ग्रामीण अर्थव्यवस्था पर्यायाने शेती व शेतकरी एका निर्णायक टप्प्यावर येऊन थांबले आहेत. शेती व शेतकर्‍यांना आता कुणी वाली उरला नाही, असे चित्र रंगविले जात आहे. यासाठी भूमिपुत्रांनाच आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 'कुणी देवदूत येईल आणि आपले कल्याण करेल' ही गोष्ट सोडून केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे 'जुने जाऊ द्या, मरणालागुनी जाळुन किंवा पुरुनी टाका, सडत न एका ठायी ठाका, सावध ऐका पुढल्या हाका' या काव्यपंक्तीप्रमाणे आपणच आपला उद्धार करण्यासाठी पुढे येऊन आजपर्यंत आपल्या पूर्वजांवर वेगवेगळय़ा व्यवस्थांच्या माध्यमातून झालेला अन्याय व अत्याचाराला आपले प्राप्त केलेले ज्ञान, आपले कौशल्य यांच्या जोरावर उत्तर देऊन शेतीच्या समृद्धीचा जागर केला पाहिजे.

या लेखमालेच्या माध्यमातून निसर्ग, शेती आणि कृषिव्यवसायाच्या विविध पैलूंचा दैनंदिन घडामोडींशी सुसंगत असा उलगडा करून तो वाचकांपर्यंत पोहोचवण्याची संधी संपादकांनी दिल्याबद्दल मी प्रथमत: आभार व्यक्त करतो. तसेच या निमित्ताने तरुणांना लिहिते करण्याची नावीन्यपूर्ण संकल्पना वाचकांसमोर येणार आहे. निसर्ग, पर्यावरण व शेतीचा सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्टीकोनाच्या पलिकडे जाऊन अन्नसुरक्षा, जागतिक तापमानवाढ, हवामानबदल, जागतिक व्यापार यांचा देशांतर्गत स्थानिक परिस्थितीशी असणारा संबंध व त्याचे ग्रामीण अर्थकारणावर होणारे लघु/दीर्घ कालीन परिणाम या अनुषंगाने लेखांची मांडणी करण्याचा मनोदय असणार आहे.

या लेखमालेच्या माध्यमातून वाचकांना या विषयामधील नावीन्यपूर्ण माहिती पोहोचवण्याबरोबरच धोरणकर्ते, राज्यकर्ते यांच्यापर्यंत शेती, शेतकरी यांचा आवाज पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी वाचकवर्गाला वाचनाच्या पलीकडे जाऊन या विषयावर विचारप्रवणहोण्यास मदत होईल. पुन्हा एकदा आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..



(सदर लेख १ जानेवारी २०१७ च्या दै. पुण्यनगरीच्या प्रवाह पुरवणीमध्ये प्रकाशित झाला आहे.http://epunyanagari.com/epaperimages//01012017//01012017-md-ah-20.pdf 

Comments

Popular posts from this blog

Twist in the tale

Limitations of Government