मला भावलेले डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम....

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना प्रत्यक्ष पाहण्याचा व ऐकण्याची संधी ते राष्ट्रपती असताना २००६ मध्ये पुण्याला सिंबायोसिस विद्यापिठात काही कार्यक्रमासाठी आले असताना प्रथम भेटली होती. कलामांना ऐकण्यासाठी सिंबायोसिसच्या सेनापती बापट रोडवरील कॅम्पस मध्ये प्रवेश मिळणे मुश्कील होते परंतु मार्ग शोधत सभागृहाच्या दरवाजापर्यत पोहोचलो व कसेबसे वाट काढत कलाम पाहायला भेटले. त्यानंतर त्याचे ७-८ मिनिटे भाषण ऐकायला भेटले. अत्यंत सोप्या भाषेत विषय समजावून सांगायची त्यांची हातोटी होती. भाषण करताना ते विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधत होते. भाषण संपल्यानंतर एक कविता त्यांनी सर्व विद्यार्थांना पाठीमागे म्हणायला लावली. यावरून त्यांच्यातील हाडाचा शिक्षक दिसून येत होता. कलामांनी आपल्या देशभरातील लाखो मुलांना “Creativity” नावाची चार ओळींची कविता ऐकवली व आपल्या मागे म्हणायला लावली होती ती कविता पुढीलप्रमाणे होती- “Learning use Creativity. Creativity leads to thinking. Thinking Provides knowledge. Knowledge makes you great.” यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी पुण्याच्या बालेवाडी संकुलात १२ जानेवारीला युवक दिनाचे औचित्य साधून ‘राष्ट्रीय युवक महोत्सवाचे’ आयोजन केले होते. त्यावेळी कलाम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून समारंभाच्या ठिकाणी आगमन करताच युवकांनी केलेला जल्लोष हा ऐतिहासिक व अभूतपूर्व होता. कलाम यांच्यासारख्या भारत रत्नाच्या दर्शनातील अद्भुत अशी जादू त्या वेळी अनुभवली होती. त्या कार्यक्रमाच्या भाषणाच्या शेवटी त्यांनी युवकांना एक शपथ दिली होती व ती ते स्वतः वाचत होते व हजारो युवक त्यांच्यामागे म्हणत होते. दिल्लीमध्ये असताना डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रमुख मार्गदर्शक असणाऱ्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला होता. स्वर्गीय विलासरावजी देशमुख ग्रामविकास मंत्री म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. समारंभातील कलामांच्या उपस्थितीने एक वेगळेच वातावरण तयार झाले होते. अपारंपरिक उर्जा या विषयावर तो कार्यक्रम होता.यावेळी कलाम यांच्यामधील भविष्यातील स्वप्ने पाहणारा व त्याची चित्रे रेखाटणाऱ्या एका शास्त्रज्ञाचे रूप पाहायला भेटले होते.कलाम यांनी भविष्यातील सौर ऊर्जेबाबत मांडलेली संकल्पना माझ्या मनात आजदेखील कुतूहलाचा विषय बनून राहिलेली आहे. कलाम यांनी ही संकल्पना त्या कार्यक्रमापूर्वी जगभरातील शास्त्रज्ञांच्या बैठकीत मंडळी होती व या त्या सर्वाना ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संशोधन करून जगातील उर्जेचा प्रश्न सोडविण्याचे आव्हान केले होते. कलामांची संकल्पना पुढीलप्रमाणे होती-“जगभरात उर्जेची समस्या भेडसावत असल्याने अपारंपरिक उर्जा स्त्रोतांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. सौर ऊर्जेबाबत आता वेगळा विचार करण्याची गरज आहे. केवळ पृथ्वीतलावर केवळ १०-१२ तास सूर्यप्रकाश मिळत असल्याने सौर उर्जा निर्मितीत अडचणी येत आहेत. यासाठी जर अवकाशातच सौर उर्जा निर्मितीचे पॉवर स्टेशन्स तयार केली तर २४ तास त्यांना वीज निर्मितीसाठी सूर्यप्रकाश उपलब्ध होईल. व ही विद्युत उर्जा लहरीच्या माध्यमातून पृथ्वीतलावर वाहून आणायची.’’ सुरुवातीला ऐकताना क्षणभर एका स्वप्नाच्या दुनियेत गेल्यासारखे वाटले पण कलामांनी पाहिलेल्या एका स्वप्नातूनच अग्निपंख साकारल्याची लगेच जाणीव झाली. तो कार्यक्रम संपल्यानंतर मी कलामांना भेटण्यासाठी त्यांच्या मागेमागे चालत होतो, हॉटेलच्या प्रवेशदाराजवळ ते पोहोचल्यानंतर मला बोलायची संधी भेटली. त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. मी त्यांची संकल्पना आवडल्याची प्रतिक्रिया त्यांना दिली. व नंतर त्यांनी माझ्याविषयी विचारले व मी कृषी शाखेचा विद्यार्थी आहे असे म्हटल्यावर त्यानी शेतामधील टाकाऊ कचऱ्यापासून उत्तर भारतातील एका गावातील वीज निर्मितीच्या प्रयोगाबाबत मला १ मिनिटात सांगितले व मला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते त्यावेळी राष्ट्रपती नव्हते त्यामुळे फारसा लवाजमा त्यांच्याबरोबर नव्हता. काळ्या रंगाची सैन्यदलातील अधिकारी वापरतात तशी गाडी त्यांची प्रतीक्षा करत होती. आपल्या अंगरक्षकाला गाडीचा दरवाजा उघडू न देणारे कलाम अतिशय विनम्रपणे सर्वाना अभिवादन करून गाडीत बसल्याचे चित्र आज जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहते आहे. तंत्रज्ञानाचा ग्रामविकासासाठी उपयोग व्हावा यासाठी ते फार आग्रही होते. राष्ट्रपती असताना त्यांनी ‘व्हिजन २०२०’ तयार करताना अन्नप्रक्रिया व कृषीवर आधारित लघु उद्योगांच्या उभारणीवर विशेष भर दिला होता. पुरा (PURA- Providing Urban Amnetites in Rural Area) ही आगळीवेगळी संकल्पना मांडली होती. व त्यासाठी पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करण्यात आली होती. ज्यायोगे गावांच्या समुहांना भौतिक, इलेक्ट्रॉनिक,ज्ञानाची जोड देऊन आर्थिक उन्नती साधण्यासाठी नागरी सुविधा देण्यावर अधिक भर देण्यात आला होता. देशभरात अशा पद्धतीचे ७००० पुरा क्लस्टर देशात निर्माण करावे लागणार असे त्यांचे मत होते. ज्यायोगे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील व ग्रामीण भागाचा विकास होईल.गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एका कार्यक्रमात ग्रामीण तंत्रज्ञानावर संशोधन करणारी संस्था असावी असे मत व्यक्त केले होते. भारतासारख्या भव्यदिव्य देशाचेच नेतृत्व करण्यासाठी नव्हे तर तंत्रज्ञान व इतर क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या ६ नेतृत्व गुणांविषयी २००८ साली व्हाटोन नॉलेज सेंटर च्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, “Leader must have Vision; Leader must be able to travel unexplored path; Leader must know how to manage success more importantly the failure; Leader should have nobility in Management; Every Action of leader should be transparent; Leader should work with integrity and succeed with integrity.” २७ जुलैच्या ‘ऑल इंडिया रेडीओ’ च्या रात्री नऊच्या बातम्या ऐकताना हिदी बातम्यांत कलाम आय.आय.एम. शिलौंग येथे व्ख्याख्यान देत असताना कोसळून पडल्याचे कानावर येताच मनात शंकेची पाल चुकचुकली होती त्यानंतर इंग्रजी बातम्या सुरु झाल्यानंतर पी.टी.आय च्या वृत्ताचा दुजोरा देत मिसाईल MAN गेल्याचे वृत्त आले आणि एका युगाचा अंत झाला या वास्तवाने मन खिन्न झाले. ***

Comments

  1. मिसार्इल MAN ला विनम्र श्रध्दांजली.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Twist in the tale

Limitations of Government